Tuesday, 12 September 2017

मराठीचा इंटरनेटवरील विकास

‘ज्ञान’ मिळवल्याने मानवी जीवनास एक नवी दृष्टी प्राप्त होते. पर्यायाने माणसाचा आध्यात्मिक तसेच आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो. पूर्वी काहीजणांपुरते मर्यादित असलेले ‘ज्ञान’ हे इंटरनेटमुळे आता सर्वांपर्यंत पोहचले आहे. ज्याला कोणाला म्हणून ज्ञान प्राप्त करायची इच्छा आहे, त्या प्रत्येकासाठी इंटरनेटरुपी महासागर आज खुला आहे. परंतु यात एक छोटासा अडसर आहे! एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान मिळवायचे झाल्यास त्यासाठी इंग्लिश भाषा अवगत असणे गरजेचे आहे. ज्यांना इंग्लिश भाषा येत नाही, त्यांना सखोल शिक्षणापासून वंचित रहावे लागते. तेंव्हा विकासाची नदी सर्वांपर्यंत पोहचावी याकरिता आपली मराठी भाषा ‘ज्ञानभाषा’ होणे अत्यावश्यक आहे. परंतु कोणतीही गोष्ट अर्थकारणाच्या व्यवहारिक चौकटीत बसवल्याखेरिज तिला मूर्तरुप येत नाही. तेंव्हा ‘ज्ञानार्जन’ आणि ‘अर्थार्जन’ अशा दोन्ही बाजूंनी मराठीच्या भवितव्याचा विचार व्हायला हवा. विशेष म्हणजे मराठी भाषिकांनी मनावर घेतल्यस मराठीचा, पर्यायाने आपला स्वतःचा उत्कर्ष साधने सहजशक्य आहे!

मराठी शोध परिणाम – मराठी गूगल

इंटरनेटची सुरुवातच मुळी ‘सर्च इंजिन’पासून होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधायची झाल्यास आज बहुतांश लोक गूगलचा वापर करतात. परंतु आपल्यापैकी किती लोक ‘मराठी गूगल’चा वापर करतात!? हा खरा प्रश्न आहे! ‘मराठी गूगल’चा वापर करायचा झाल्यास गूगलच्या शोध चौकटीखाली (Search Box) देण्यात आलेला ‘मराठी’ भाषेचा पर्याय निवडावा. आपल्या मनामधील प्रश्नाचे उत्तर जर मराठी भाषेतून हवे असेल, तर मराठी गूगलच्या शोध चौकटीत मराठी ‘सारशब्द’ (Keywords) टाकावेत. त्याकरिता Google Indic Keyboard (अँड्रॉईडसाठी) आणि Google Input Tools (संगणकासाठी) हे गूगलचे मोफत मराठी कीबोर्ड वापरता येतील. मराठीमधून शोध घेतल्याने मराठी शोध परिणाम आपल्यासमोर दिसू लागतात. परंतु त्याचवेळी त्यात काही हिंदी शोध परिणामांची देखील रसमिसळ झालेली असू शकते. मराठी व हिंदी या दोन्ही भाषांकरिता देवनागरी लिपीचा वापर होत असल्याने असे होत असावे, असे वरकरणी वाटू शकते. परंतु हिंदी गूगलमध्ये शोध घेतला असता एकही मराठी शोध परिणाम समोर येत नाही; शिवाय ‘ळ’ हे अक्षर आणि मराठी शब्द यांच्या सहाय्याने गूगलला इंटरनेटवरील मराठी पान ओळखणे सहजशक्य आहे.
मराठी गूगल
इंटरनेटवर मराठीमधून शोध – गूगलची मराठी आवृत्ती – मराठी गूगल
मराठी गूगलमध्ये शोध घेतल्यानंतर जर एखाद्यास इंटरनेटवरील मराठी पान सापडणार नसेल, तर अशाने मराठीची मोठी पिछेहाट होईल. गूगल सर्वसामान्य वापरकर्त्यांची फारशी दखल घेताना दिसत नाही, तेंव्हा महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाने यादृष्टीने गूगलकडे योग्य तो पाठपुरावा करायला हवा.

No comments:

Post a Comment